म्हशीचे उत्पादन




                                       म्हशीचे उत्पादन



आपल्या एकूण दूध उत्पादनात म्हशींच्या दुधाचा मोठा वाटा आहे. निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे उत्तम प्रतीच्या दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशींमध्ये अधिक असल्याने सध्या अधिक दुग्धोत्पादनासाठी म्हशी पाळणे किफायतशीर आहे, म्हणून म्हशींचे संगोपन चांगल्या रीतीने करण्याची गरज आहे. दूध उत्पादनाशिवाय मांसोत्पादन व ओढकामासाठीसुद्धा म्हशींचा/रेड्यांचा वापर केला जातो. म्हशींचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन केल्यास त्यापासून अधिकाधिक नफा मिळतो. म्हशींच्या जाती ः 
मुऱ्हा दिल्ली ः उत्तर भारतात, तसेच महाराष्ट्रात ही जात आढळते. शरीरबांधा मोठा, भारदस्त व कणखर असतो. एका वेतातील दुधाचे प्रमाण 1800 ते 2000 लिटर असते. 

मेहसाणा ः ही जात सुरती व मुऱ्हा जातींच्या संकरापासून निर्माण झाली असून, शरीर वैशिष्ट्ये मुऱ्हा जातीशी मिळती जुळती आहेत. या म्हशी एका वेतात सरासरी 2000 लिटरपर्यंत दूध देतात. 

पंढरपुरी ः सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. या म्हशी आकाराने मध्यम पण अतिशय काटक असतात. लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोचणारी लांब व पिळवटलेली शिंगे ही त्यांची वैशिष्ट्ये. म्हशींचे वजन साधारण 400 किलो व रेड्याचे वजन 500 किलो असते. पारड्या वयाच्या 25 ते 30 महिन्यांत गाभण राहतात आणि 35 ते 40 महिन्यांत पहिल्यांदा वितात. मध्यम शरीर, लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकडकाळ, पहिल्या वेताच्या वेळी कमी वय, उत्तम प्रजोत्पादन व दुग्धोत्पादन क्षमता आणि दुग्धोत्पादनाचे सातत्य या गुणांमुळे दुधासाठी ही जात चांगली आहे. हे सर्व गुण एकत्रितपणे इतर जातीत आढळत नाहीत. या म्हशी एका वेतात 1500 ते 1800 लिटर दूध देतात.



सुरती ः शरीर बांधा मध्यम, कान लांबट, रुंद व शिंगांनी झाकलेले असतात. भुवयांचे केस पांढरे, डोळे मोठे व शिंगे मध्यम व विळ्यांच्या आकाराची असतात. शरीराचा रंग भुरा व मानेवर ठळक पांढरे आडवे पट्टे असतात. एका वेतातील दुधाचे उत्पादन 1800 लिटर असते, जास्त काळ दूध देते व दुधात स्निग्धांश जास्त असतो. 

जाफराबादी ः या जातीच्या म्हशी आकाराने आणि वजनाने सर्वांत मोठ्या असतात. शरीर लांब आणि शरीराची हाडे पूर्ण वाढलेली पण शरीराच्या मानाने मांसल भाग कमी असतो. शिंगे मुळात जाड आणि चपटी, मुळापासून पाठीमागे आणि खालच्या बाजूने वळलेली असतात. या जातीची म्हैस एका विताला 1800 ते 2500 लिटर दूध देते. त्याचबरोबर नागपुरी, निलिराबी इ. म्हशींच्या जाती आहेत. 

म्हशीची पैदास ः म्हशींचे प्रजोत्पादन करण्यासाठी शुद्ध जातीचा व उत्तम प्रतीचा रेडा निवडावा. लवकर गाभण राहणाऱ्या व जास्त दूध देणाऱ्या म्हशींपासून पैदा झालेला वळू निवडावा व त्याची चांगली जोपासना करावी. त्याचा उपयोग करून त्याच जातीची शुद्धता व वैशिष्ट्ये जतन करावीत. निवड पद्धतीनेच म्हशींमध्ये सुधारणा करणे शक्यद आहे. त्यापासून मिळणाऱ्या पिढ्यांची वाढ करणे फायद्याचे ठरते. जनावर व्याल्यावर 2 महिन्यांनी वळू दाखवावा व विण्यापूर्वी एक ते दीड महिना जनावर भाकड करावे. 

आहार व निगा ः 
क्षमतेइतके दूध मिळण्यासाठी सर्वसाधारणतः 400 किलो वजन असलेल्या म्हशीस दररोज 25 किलो हिरवा चारा व 7 ते 8 किलो कोरडा चारा तिची भूक भागविण्यासाठी व शरीर पोषणासाठी द्यावा. दूधनिर्मितीसाठी, दररोजच्या एकूण दूध उत्पादनाच्या 50 टक्के खुराक द्यावा, म्हणजे दूध उत्पादनाचे सातत्य टिकून राहील. प्रत्येक म्हशीला पिण्यासाठी 60 ते 75 लिटर पाणी रोज लागते.
दिवसातून ६-८ वेळा चारा टाकावा तसेच खूराकाचे ३-४ भागात विभाजण करावे.खूराक देताना १ तास अगोदर चारा / वैरण घालू नये.दोन चा-यातील अंतर ३ तास असावे.

म्हैस खरेदी करताना पशुवैद्यकाकडून प्रजनन तपासणी करावी आणि प्रजननसंस्था अगदी चांगली असल्याचे निदान मिळाल्याशिवाय खरेदी करू नये. प्रजननाच्या दृष्टीने म्हशीच्या कमरेचा भाग मोठा असावा, तर निरणाचा भाग सैलसर नसावा. दोन्ही निरणांच्या बाजू जास्तीत जास्त एकमेकांजवळ असून, चिकटल्यासारख्या राहाव्यात. म्हैस खरेदी करताना तिच्या लिखित नोंदी तपासण्याबाबत आग्रह असावा. म्हशीची वंशावळ आणि आरोग्य तपासून घ्यावे. जनावरांची निवड करताना संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव नसल्याची खात्री करणाऱ्या चाचण्या होणे अत्यंत आवश्यतक असते. नवीन म्हशी खरेदी करण्यासाठी, व्यवसाय सुरू असल्यास, चालू उत्पादनातून दर वितास म्हशीच्या किमतीच्या 25 टक्के रक्कम बचत म्हणून बाजूला काढून ठेवावी, म्हणजे म्हैस खरेदीचा आर्थिक ताण येत नाही. 

दहा लिटर दूध देणाऱ्या म्हशींच्या दूध उत्पादनात 9।। लिटर दूध केवळ पशू व्यवस्थापनावर अवलंबून असते, तर अर्धा लिटर दूध हे म्हशींच्या आनुवंशिक क्षमतेचा भाग असते. म्हशींचा गोठा ही म्हशींसाठी महत्त्वाची आणि मूलभूत गरज असते. म्हशींच्या बाबतीत एक महत्त्वाची बाब म्हणजे म्हैस जितका वेळ बसेल तितके तिचे दूध उत्पादन वाढते, म्हणून गोठ्यामध्ये म्हशींना आरामात बसता येईल एवढी प्रशस्त, हवेशीर, मोकळी, थंड जागा उपलब्ध असावी. म्हशींना छताखाली प्रत्येकी चार चौरस मीटर जागा लागते, तर गव्हाणीची जागा 60 ते 75 सें.मी. रुंद असावी लागते. मोठ्या पारड्यांना छताखाली 2 चौ.मी., तर लहान पारड्यांना 1 चौ.मी. जागा असावी. प्रशस्त व मोकळे गोठे म्हशींसाठी आवश्यतक असतात. 


म्हशी गोठ्यात मोकळ्या सोडणे व्यवस्थापनाच्या दृष्टीने जास्त उपयोगी पडते. गोठ्यात मुक्त वावरत असणाऱ्या म्हशी पुरेसा आहार, व्यायाम आणि पाणी सहज आणि वाटेल तेव्हा घेऊ शकतात. यातूनच त्यांची दूध उत्पादकता काही प्रमाणात वाढूही शकते. 

पूर्व-पश्चि्म दिशेस बांधलेला गोठा दिवसभर सूर्यप्रकाश राहण्यासाठी, तर गोठ्यातील जागा कोरडी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. गोठ्यातील तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि प्रकाश या सर्व बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. गोठ्याचा मुख्य भाग हा त्यातील जमिनीचा असतो. शेण, मलमूत्र साचणार नाही आणि सतत तो कोरडा होण्यास मदत होऊ शकेल, अशी रचना असलेला गोठा म्हशींसाठी नेहमी चांगला ठरतो. उतार असणारी आणि नेहमी कोरडी असणारी जमीन असल्यास गोठ्याची उपयुक्तता 50 टक्के पूर्ण होते. शक्यीतो गुळगुळीत, निसरडी जमीन होणार नाही याची वेळोवेळी काळजी घ्यावी. 

गोठ्याच्या भिंती केवळ पाच ते सहा फूट एवढ्या उंच असल्या तरी पुरेशा ठरतात. या भिंती वीट बांधकामाच्या असाव्यात असे नाही. उपलब्ध दगड, माती यातून बांधलेल्या भिंती, तर या भिंतींच्यावर तेवढ्याच उंचीची लोखंडी जाळी भरपूर हवा खेळती राहावी या दृष्टीने अधिक उपयोगी पडते. गोठ्याचे छप्पर ही दुसरी महत्त्वाची बाब. पावसात म्हैस भिजली तरी नुकसान होत नाही. मात्र, उन्हाळ्यात तिच्या अंगाची होणारी आग मोठ्या प्रमाणात बाधक ठरते. म्हशींना शरीराचे तापमान थंड व संतुलित ठेवण्यासाठी गोठ्यातील तापमान नेहमी थंड (20 अंश ते 25 अंश सेल्सिअस) असावे. म्हशींना उष्णता अजिबात सहन होत नाही. 

Comments

Popular posts from this blog

पाणी परीक्षण करणे.

POULTRY